संदीप टूले
दौंड, (पुणे) : दौंड शहरातील एका अल्पवयीन मुलीवर मागील दोन वर्षे सतत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत दौंड पोलिसांनी आरोपी करण धनराज बेंद्रे (रा-घंटाचाळ दौंड, ता-दौंड जि-पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी ही गरीब कुटुंबातील असून, तिच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन आरोपी हा तिला लग्नाचे आमिष दाखवत तब्बल दोन वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत राहिला. आरोपी हा पीडित मुलीला गोड बोलुन त्याच्या घरी घेऊन जात असे आणि मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असे. या सर्व प्रकारानंतर पीडिता ही आपल्या आईसोबत दुसऱ्या एका ठिकाणी राहायला गेली.
मात्र, ती घरी एकटी असताना करण धनराज बेंद्रे हा त्यांच्या घरासमोर यायचा. माझ्यासोबत चल, असे पीडितेला म्हणायचा. मात्र, पीडितेने त्याला नकार दिला की, तो तिला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देऊन तिला त्याच्या दुचाकीवर बसवुन कुरकुंभ (ता-दौंड जि-पुणे) येथील लॉजवर घेऊन जाऊन तिथे तिच्यावर बलात्कार करायचा. असेच 5 मे रोजी पीडित मुलगी ही घरी एकटी असताना करण हा त्याठिकाणी आला आणि मला तुझ्यासोबत लग्न करायाचे आहे. तु माझ्यासोबत चल असे म्हणून तिला त्याच्या घरी घेऊन गेला. लग्न करतो असे सांगुन त्याने पुन्हा पीडित मुलीसोबत शारीरीक संबंध ठेवू लागला.
दरम्यान, 29 जुलै रोजी पीडितेचा वाढदिवस असल्याने तिने, तू माझ्यासोबत लग्न कधी करणार असे आरोपीला विचारले असता ‛करु’ असे त्याने उत्तर दिले. लग्नाला होत असलेल्या टाळाटाळ नंतर हा सर्व प्रकार असह्य झाल्याने अखेर पीडित मुलीने दौंड पोलीस ठाण्यात येऊन आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत.