राहुलकुमार अवचट
Daund Crime दौंड : दोन वर्षांपूर्वी कुसेगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या वादाची बातमी लावल्याचा रागातून पत्रकार विनोद मनोहर गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.
पाटस (ता. दौंड) Daund Crime येथे लग्न विवाह समारंभाच्या कार्यक्रमात आलेल्या गायकवाड यांच्यावर मागील दोन दिवसापूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला.
साहिल रामदास गायकवाड, शुभम भानोबा गायकवाड, सत्यम भानोबा गायकवाड, स्वप्निल रामदास गायकवाड, गणेश लिंबाजी गायकवाड (सर्व रा. कुसेगाव ता. दौंड जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
दौंड येथील लोकशाही न्यूज चॅनलचे पत्रकार विनोद गायकवाड हे ३० एप्रिलला पाटस येथील पंचरत्न मंगल कार्यालयामध्ये लग्न विवाह समारंभाच्या कार्यक्रमासाठी आले होते. गायकवाड हे लग्न मंडपातून जेवायला जात होते.
तेव्हा आरोपींनी गायकवाड यांना शिवीगाळ करत आज तुला सोडतच नाही, तु दोन वर्षापासून खोटया नाटया बातम्या देतोस, आज तुझी पत्रकारीताच काढतो असे म्हणून हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच शुभम गायकवाड याने हातातील कसल्यातरी धारधार हत्याराने डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात विनोद गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. या जीवघेण्या हल्ल्यातून विनोद गायकवाड हे बचावले असले तरी अतिशय गंभीर घटना आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत दौंडसह राज्यभरातील विविध पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आणि आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नुकताच या प्रकरणी पाच जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पत्रकारावर हल्ला करणे, शिवीगाळ करणे मारहाण करणे या गंभीर गुन्ह्यांसाठी अजामीन पत्र गुन्हा आहे, पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी हा दौंड तालुक्यातील पहिलाच गुन्हा आहे.