Crime News | जुन्नर, (पुणे) : घरातील सर्वजण दशक्रियेच्या विधीसाठी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेल्याची घटना गोळेगाव (ता. जुन्नर) परिसरात शुक्रवारी (ता. २१) सकाळी घडली आहे.
चैतन्य सदाशिव शेटे (रा. गोळेगाव, ता. जुन्नर) या शेतकर्याने या चोरीची फिर्याद रात्री उशिरा दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य शेटे हे द्राक्ष बागायतदार असून शेतात राहतात. शेटे यांच्या आजीचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी असल्याने घरांमधील सर्वजण व आलेले पाहुणे मंडळी कुकडी नदी किनारी गेले होते. विधी संपल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वजण घरी आले. त्यानंतर काही वेळानंतर चैतन्य यांच्या पत्नीला तिच्या पर्समध्ये असलेले पैसे नसल्याचे लक्षात आले.
तिने पती चैतन्य यांना हा प्रकार सांगितला. सायंकाळी शेतावरून घरी आल्यानंतर त्यांनी घरातील कपाट तपासण्याकरिता कपाटाच्या चाव्या नेहमीच्या जागी पहिल्या असत्या त्या तेथे नसल्याचे लक्षात आले. दुसर्या चाव्यांनी कपाट उघडले असता तेथे ठेवलेला १० तोळे सोन्याचा हार, ८ तोळे वजनाच्या बांगड्या, २ तोळ्याचीं साखळी असे दागिने व ९० हजारांची रोख रक्कम अशा ऐवजाची चोरी झाल्याचे लक्षात आले.
दरम्यान, याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर अनोळखी चोरट्यांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल मोरडे, अंमलदार किशोर जोशी हे या घटनेचा तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.