crime : नांदेड शहरात अवघ्या 24 तासांत घडलेल्या सलग 2 खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. शुक्रवारी मध्यरात्री गँगवारमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी रात्री आणखी एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जुना मोंढा परिसरातील मुरमुरा गल्ली येथे रात्री सुमारे 11:30 वाजता रणजितसिंह तबेलेवाले (वय 35) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले, मात्र वझीराबाद पोलीस यांनी काही तासांतच 2 संशयितांना ताब्यात घेतले.
या घटनेच्या काही तासांपूर्वीच भाग्यानगर पोलीस ठाणे हद्दीत गँगवार झाली होती. दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाच्या वादातून झालेल्या या चकमकीत 2 जण जागीच ठार झाले, तर तिसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनांमुळे शहरात तणाव वाढला असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या सलग हत्यांमागे गँगमधील वर्चस्वाचा संघर्ष हे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. वाढती बेरोजगारी, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळे अशा टोळ्या सक्रिय होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गँगवार प्रकरणात पोलिसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली असून त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान आणखी काही आरोपींचा सहभाग उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







