Crime : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावातून समोर आलेली घटना केवळ धक्कादायक नाही, तर माणुसकीलाच हादरा देणारी आहे. चोरीच्या केवळ संशयावरून एका वडिलांनी आपल्या दोन मुलींवर अमानुष अत्याचार केल्याने 10 वर्षांची सानिका हिचा मृत्यू झाला, तर 11 वर्षांची अनुजा गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.

ही घटना बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक माहितीनुसार, शेजाऱ्याच्या घरात चोरी झाल्याचा संशय या मुलींवर घेतला गेला. संतापाच्या भरात वडील नाना हैबत यमगर यांनी दोन्ही मुलींचे हात-पाय बांधून त्यांना घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगून ठेवले. पुढील संपूर्ण रात्र या निष्पाप मुली असह्य वेदनेने तडफडत होत्या. “पाणी, पाणी” अशी आर्त हाक देऊनही त्यांना मदत मिळाली नाही.
या घटनेचा सर्वात अस्वस्थ करणारा भाग म्हणजे, मुलींना अशा अवस्थेत सोडून आई-वडील घरात झोपले होते, तर बाहेर आजी-आजोबा होते. रात्रीच सानिकाचा मृत्यू झाला, मात्र सकाळी सुमारे 6 वाजता मुलींना खाली उतरवले गेले, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अनुजा बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. घटनेची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून कुटुंबीयांनी सानिकेचा अंत्यसंस्कार घाईघाईत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर अनुजाने दिलेल्या माहितीमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला.







