लोणी काळभोर, ता.11 : पुणे-सोलापूर महामार्गावर आकाशवाणी (हडपसर) ते उरुळी कांचन दरम्यान मागील दहा वर्षांपासून वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुला अगदी रस्त्यालगत वाढलेली अतिक्रमणे, दोन्ही बाजूला वाढलेली हॉटेल्स, विविध ढाबे, हॉटेलच्या ठिकाणी रस्त्यावर तयार केलेले गतिरोधक, सेवा रस्त्यावर केलेले अतिक्रमण, महामार्गावरच चारचाकी गाड्या थांबवणे, लेनची शिस्त न पाळणे आणि दारू पिऊन गाडी चालविणे अशा विविध गोष्टींमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.
बेशिस्त वाहतूक व चौकाचौकातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे हडपसर (आकाशवाणी)- कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी या दरम्यान छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दहा वर्षांचा विचार केल्यास, या मार्गावर किमान आठशेहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. चौकांमधील वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबरच या मार्गावरील बेशिस्त वाहतुकीवर निंयत्रण ठेण्यासाठी नेमलेले वाहतूक पोलिस वाहतूक नियमणाचे मुळ काम सोडुन वेगळ्याच कामात गुंतल्याचे दिसुन येत आहे. पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध धंदे, गुंडगिरी आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी व या कोंडीला कारणीभूत असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या नातकर्तेपणावर सर्जिकल स्ट्राईक करावा, अशी मागणी पुर्व हवेलीमधील नागरीकांनी केली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर हद्दीत आकाशवाणी, १५ नंबर चौक, शेवाळवाडी व फुरसुंगी फाटा या चौकात दररोज वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसुन येते. तर लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत लोणी स्टेशन चौक, एमआयटी कॉर्नर, लोणी कॉर्नर, थेऊर फाटा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही बाब नित्याचीच ठरलेली आहे. तसेच उरुळी कांचन पोलिसांच्या हद्दीत ऍलाईट चौक व तळवडी चौक हे वाहतूक कोंडीचे मोठे हॉटस्पॉट बनले आहेत. लोणी स्टेशन चौकात वाहतूक पोलिस फक्त वरीष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी चौकात उपस्थित रहातात की काय अशी परीस्थिती आहे. एमआयटी कॉर्नरला तीन वाहतूक पोलिस असूनही त्या ठिकाणी वाहतूक कोंडी व अपघात वाढत असल्याचे दिसुन येत आहे. एमआयटी कॉर्नरला असणारे पोलिस कर्मचारी एकाच ठिकाणी थांबून वाहतूक नियमन करण्याऐवजी वसुलीसाठी सावज शोधण्याचे काम करीत असतात.
एक आदमी साला…
हडपसर गावच्या हद्दीत हडपसर गाव ते पंधरा नंबर या दरम्यान रात्री आठ ते मध्यरात्रीपर्यंत खाजगी ट्रॅव्हल्स व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे पुण्याहून उरुळी कांचनकडे जाणाऱ्या बाजूच्या लेनवर दररोज वाहतूक कोंडी होते. लग्नसराई, दिवाळी सुट्टी व उन्हाळी सुट्टी या काळात तर रस्त्यात थांबलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे दोन-दोन तास वाहतूक ठप्प होते. हडपसर परीसरातील एका नेत्याच्या हट्टामुळे व खाजगी ट्रॅव्हल्स, अवैध प्रवासी करणाऱ्या मोठ्या गाडीवाल्यांकडून मिळणाऱ्या आर्थिक मायेमुळे हडपसर व वाहतूक अशा दोन्ही पोलिस यंत्रणा या मोठ्या गाड्यांना रस्त्यात थांबू देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून येथील कोंडीबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करुनही दाद मिळत नसल्याने या ठिकाणी पोलिस आयुक्तांनी सर्जिकल स्ट्राईक करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
‘सात’च्या आत सुखरूप घरात, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांचे नवीन धोरण
पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारीत असणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांची ड्युटी बारा तास असल्याचे बोलले जाते. मात्र, शहर वाहतूक पोलिसांचाच एक भाग असलेले लोणी काळभोर वाहतूक विभाग मात्र याला अपवाद असावा, अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. लोणी काळभोर वाहतूक पोलिस दलातील ठराविक कर्मचारी आपल्या नेमलेल्या जागेवर त्यांच्या वेळेनुसार हजर राहत असल्याचे दिसुन येते. मात्र, सकाळी नऊ वाजता सेल्फी काढून पाठवला की अनेक महाभाग आपआपल्या कामासाठी निघून जात असल्याचे चित्र आहे. लोणी स्टेशन चौक व एमआयटी कॉर्नर या ठिकाणी वाहतूक नियमन नावालाच उरले असून अनेक पोलिस कर्मचारी सात वाजण्यापूर्वीच नेमलेल्या जागा सोडून जातात. यामुळे लोणी स्टेशन चौक व एमआयटी कॉर्नरला रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांची गरज असतानाही पोलिसांनी मात्र ‘सात’च्या आत सुखरूप घरात हे धोरण स्वीकारले आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
थेऊर पाट्यावरील वाहतूक पोलिस आडोशाला अथवा वसुलीला..
लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या हद्दीतील थेऊर फाटा हा परीसर सध्या वाहतूक कोंडीचा मोठा स्पॉट बनला आहे. या ठिकाणी नेमणुकीस असणारे बहुतांश पोलिस कर्मचारी वाहतूक नियमन सोडून आडोशाला थांबत असल्याचे चित्र आहे. तर काही पोलिस कर्मचारी थेऊर फाटा उड्डाणपुलाच्या एका कोपऱ्यात थांबून वसुलीवर भर देत असल्याची बाब नित्याचीच झाली आहे. थेऊरकडून येणाऱ्या वहानांना पोलिसांचा टोल दिल्याशिवाय पुलावर चढताच येत नाही. थेऊर फाट्यावर पोलिसांनी वाहतूक नियमनाकडे लक्ष दिल्यास अनेक अपघात कमी होतील, अशी परीस्थिती आहे.
आयुक्तसाहेब, तुम्ही सर्जिकल स्ट्राईक खरंच करा…
पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध धंदे, गुंडगिरीवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचे जाहीर केले आहे. त्या दिशेने पाऊलेही टाकण्यास सुरुवात केली आहे. ही बाब नागरिकांना सुखावणारी आहे. मात्र, शहरातील अवैध धंदे, गुंडगिरीबरोबरच हवेलीच्या पुर्व भागातील नागरीकांना दररोज भेडसावणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी व या कोंडीला कारणीभुत असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या नातकर्तेपणावर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील एका वर्षात कवडीपाट ते उरुळी कांचन या दरम्यान झालेल्या विविध अपघातात सत्तरहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुणे-सोलापुर महामार्गावरील कोंडीबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करुनही दाद मिळत नसल्याने नागरिक संतापले आहेत. पुणे शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मागील पंधरा दिवसांतील कामगिरी पहाता आमच्याही भागातील अवैध धंदे, गुंडगिरीबरोबरच वाहतूक कोंडीवर आयुक्तसाहेब, तुम्ही सर्जिकल स्ट्राईक खरंच करा, अशी म्हणण्याची वेळ पुर्व हवेलीमधील नागरिकांवर आली आहे.