Pune Crime: पुणे : शहरात मागील काही दिवसांत सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोनसाखळी चोर पुन्हा सक्रीय झाल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुण्यातील सेनापती बाबट रोडवर आनंद यशोदा हौसिंग सोसायटीच्यासमोर भाऊबीजेच्या दिवशी (ता. १५) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली.
याबाबत रजनी गौतम वाघमारे (वय-६०, रा. आनंद यशोदा हौसिंग सोसायटी, नालंदा बुद्ध विहार, सेनापती बापट रोड, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका सोनसाखळी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी रजनी वाघमारे या रेशन दुकानात पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि शिंदे कोठे राहतात, अशी विचारणा केली. त्यावेळी महिलेने याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ येत, दुचाकीवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले.
दरम्यान, याच चोरट्याने थोड्या अंतरावर असलेल्या विश्रामबाग को-ऑप. सोसायटीच्या गेटजवळून शुभांगी साळुंखे (वय-५०) यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसका मारून चोरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाळके करीत आहेत.