पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील जयहिंद हायस्कूलमध्ये मुले आणि मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे माहित असताना देखील अशाप्रकारे शाळा प्रशासनाने कॅमेरे लावल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड शहरातील जयहिंद हायस्कूलमधील स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियातून याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पालकांनीही याला विरोध केला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी १६ मार्च रोजी सकाळी शाळेच्या आवारात काही पालकांनी गर्दी केली होती. त्यावेळी हे सीसीटीव्ही तब्बल ५ ते ६ वर्षांपासून स्वच्छतागृहांमध्ये लावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, याबाबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळेत जात त्या ठिकाणावरील कॅमेरे हटवले आहेत. तसेच शाळेला याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच शाळा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत बोलताना जयहिंद हायस्कूलच्या प्राचार्य ज्योती मसंद म्हणाल्या की, शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे ६ वर्षांपासून बसवले आहेत. मात्र वॉशरुमध्ये कॅमेरे बसवले नसून ते वॉशबेसिनकडे बसवले आहेत. त्याठिकाणी मुले हात धुतात. मुलांची सुरक्षितता या उद्देशाने हे कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, पालकांनीच याबाबत तक्रार केल्याने आता सर्व कॅमेरे काढण्यात आले आहेत.