लोणी काळभोर : दारूच्या नशेत हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या तिघांनी घटनास्थळी दाखल झालेल्या बिटमार्शल पोलिसांनाही उद्धट वागणूक देत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील राहींजवस्ती परिसरात सोमवारी (ता. १३ जुलै) रात्री घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय दिलीप जवळकर (वय २९), निखील बाळासाहेब पवार (वय २७) आणि हनुमंत दत्तात्रय कुंभार (वय २३, सर्व रा. राहींजवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अंकुश गणपत घुले यांनी याप्रकरणी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिटमार्शल पथक पेट्रोलिंग करत असताना एमडीटी डिव्हाईसवर आनंदवस्ती परिसरातून मदतीचा कॉल प्राप्त झाला. कॉलमध्ये काही व्यक्ती दारूच्या नशेत शिवीगाळ करत असल्याची माहिती देण्यात आली होती. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता, तेथे तीन युवक उभे असल्याचे दिसून आले. तक्रारदार पोलीस अंमलदार अंकुश घुले यांना आरोपींनी दारू पिऊन शिवीगाळ व दमदाटी केली. पोलिसांनी संबंधितांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उलट आरेरावीची भाषा सुरू केली.

मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करत “तुमची सीपी साहेबांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करतो, तुम्हाला बघून घेतो” अशी धमकी देत पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणले. प्राथमिक पाहणीत दोघांच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी अक्षय जवळकर, निखील पवार आणि हनुमंत कुंभार यांच्याविरुद्ध लोणी काळभोर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३१, २२१, ३(५) व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राणी खामकर करत आहेत.
याबाबत बोलताना निखील पवार म्हणाला कि “आम्ही हॉस्टेलच्या शेजारी कुटुंबासह राहतो. हॉस्टेलमधील काही तरुण वारंवार रात्री दारू पिऊन आरडाओरडा व गोंधळ घालतात. याबाबत यापूर्वीही तक्रार केली होती. कालही त्यांना शांत राहण्यास सांगितल्यावर वाद झाला. आमच्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा असून पोलीसांनी निष्पक्ष चौकशी करून हॉस्टेलमधील गोंधळ कायमचा बंद करावा आणि आम्हाला न्याय द्यावा, एवढीच आमची मागणी आहे.”







