नाशिक: लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेला अशोक खरात सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. एकेकाळी भविष्य सांगणारा आणि धार्मिक विधींच्या नावाने चर्चेत असलेला खरात आता इतर अंडरट्रायल कैद्यांप्रमाणेच तुरुंगातील जीवन जगत असल्याची माहिती समोर आली आहे.

तुरुंगातील सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरातला कोणतीही विशेष किंवा व्हीआयपी सुविधा देण्यात आलेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आले असले, तरी त्याच्याशी इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक दिली जात आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची असल्यामुळे ही व्यवस्था करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, खरात रोज सकाळी लवकर उठून ध्यान करतो. त्यानंतर तो काही वेळ मोठ्याने मंत्रोच्चार करत धार्मिक साधना करत असल्याचे सांगितले जाते. तुरुंगातील त्याची ही दिनचर्या नियमित सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सुरुवातीला तुरुंगातील काही कर्मचारी आणि कैदी त्याच्याकडे भविष्य किंवा वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारत असत. वारंवार अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असल्याने तो त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याने इतरांशी बोलणे कमी केले असून सध्या तो बहुतांश वेळ शांत राहणे पसंत करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

अशोक खरातविरुद्ध धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून अनेक पीडितांनी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, तुरुंगातील त्याच्या दैनंदिन आयुष्याबाबत विविध चर्चा सुरू असल्या तरी त्याच्यावरील गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे.







