पुणे : मतदानासाठी पैसे वाटप करणार्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत असलेल्यांना शिवीगाळ करुन मारहाण केल्या प्रकरणी भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्यासह चौघांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार पेठेतील आएशा कॉम्प्लेक्स येथे रविवार (ता. २६) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.
गणेश बिडकर, मयुर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फैयाज कासाम शेख (वय ३८ , रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे युवक काँग्रेसचे पुणे कॉन्टोन्मेंट मतदार संघाचे माजी अध्यक्ष असून ते मालधक्का चौकात त्याचे मित्र याकुब बशीर शेख यांच्यासह फिरत होते. त्यावेळी आएशा कॉम्प्लेक्समध्ये भाजपाचे कार्यकर्ते हे मतदारांना पैशांचे वाटप करीत आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. त्याची खात्री करण्यासाठी ते तेथे गेले. त्यावेळी गणेश बिडकर, मयुर चव्हाण, नईम शेख, बाला शेख हे उभे असल्याचे दिसले.
त्यांच्या हातामध्ये केशरी रंगाची पिशवी व मतदारांचे स्लिप्स दिसल्या व या पिशव्यामध्ये पैसे असून ते मतदारांना वाटत असल्याबाबत त्यांनी विचारणा केली. तेव्हा फिर्यादी व त्यांचा मित्र याकुब शेख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धक्का देऊन तेथून ते पळून गेले. या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
याप्रकरणी भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.