लोणी काळभोर : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील एक महिन्यापासून ड्रोन टेहळणी करीत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. तर सोरतापवाडी व कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे झालेल्या तीन चोऱ्या, या ड्रोनने रेकी करून झाल्या असल्याचा संशय नागरिकांना आहे. अशातच आळंदी म्हातोबाची येथेही चोरट्यांनी तीन ठिकाणी, घरफोडी झाल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरुवारी (ता.२०) पहाटे अडीज वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. तर दोन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
दरम्यान, मागील तीन दिवसांपासून गावाच्या परिसरात ड्रोन घरांवर घिरट्या घालत असल्याने अनेक नागरिकांना दिसून आले आहे. त्यामुळे या घरफोड्याही ड्रोनने रेकी करून झाल्या असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पूर्व हवेलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाऊसाहेब रावसाहेब हरपळे (वय-४०), उमेश गायकवाड (वय-५६) व रतन गायकवाड) यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब हरपळे , उमेश गायकवाड व रतन गायकवाड हे तिघेही शेतकरी असून आळंदी म्हातोबाची गावात राहतात. बुधवारी (ता.१९) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघेही नेहमीप्रमाणे झोपी गेले. तेव्हा मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी या तिघांची घराशेजारी कुलूप लावून बंद असलेल्या खोल्या फोडल्या. मात्र चोरट्यांना या मध्ये कोणत्याही मौल्यवान वस्तू आढळून आल्या नाहीत.
लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी घरफोड्या करून धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी ड्रोन गावांमधून फिरत असल्याची व त्याद्वारे टेहेळणी करून चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा, गावांमध्ये रंगत आहे. ड्रोनचे गूढ वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, ही घटना घडण्याच्या अगोदर नागरिकांना या भागात आकाशात ड्रोन कॅमेरे फिरताना दिसले होते. तेव्हा नागरिकांनी ड्रोनचा पाठलाग केला. मात्र, त्यांना ड्रोन सापडला नाही. हा ड्रोन घरापासून सुमारे 300 ते 400 फूट उंचीवरून फिरत असून ‘लेझर लाईट’ प्रमाणे त्याचा उजेड पडत आहे. ड्रोनने रेकी करूनच या घरफोड्या झाल्याचा संशय नागरिकांना आहे.
चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद
भाऊसाहेब हरपळे , उमेश गायकवाड व रतन गायकवाड यांच्या घरांची घरफोडी करणारे दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. त्यांच्या हातात तीक्ष्ण हत्यार व पाठीला बॅग व ओळख पटू नये म्हणून चेहऱ्याला मफलर बांधलेला असल्याचे दिसून आले.