Buldhana Accident News : समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात शनिवारी मध्यरात्री खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दुभाजकाला आदळून बसची डिझेलची टाकी फुटली आणि बसला आग लागली. बसमधून प्रवाशांना बाहेर पडता न आल्यामुळे प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.(Buldhana Accident News)
अपघातात २५ जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, फॉरेन्सिक टीमने २४ तास प्रयत्न केले तरी सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी करून मृतदेह कुणाचा हे कळायला कमीतकमी पाच दिवस लागतील असे सांगितले जात आहे. मात्र, जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ३ दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवणे कठीण आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी मृतदेह ताब्यात देताना येणाऱ्या अडचणींसंदर्भात नातेवाईकांशी चर्चा केली. सर्वांनी मिळून बुलढाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित केले.(Buldhana Accident News)
बुलडाण्यातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत हा अंत्यविधी होणार आहे. अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना नातेवाईकांचा एकच आक्रोश केला. मन हेलावणारी अशी दृश्य याठिकाणी पाहायला मिळत आहेत. (Buldhana Accident News)अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांपैकी एक मृतदेह हा नागपूर येथील झोया या मुस्लिम तरुणीचा आहे. रात्री उशिरा तिचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहचले. आम्हाला मृतदेह दफन करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार श्वेताताई महाले यांनी रात्री दोनपर्यंत झोयाच्या नातेवाईकांशी चर्चा केली. आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह ओळखता येईल, असे तिचे नातेवाईक म्हणाले.
दरम्यान, २५ पैकी एका मृतदेहाचा चेहरा आणि शरीराची ठेवण पाहून तो मृतदेह झोयाचा असल्याचे तिच्या नातेवाईकांचे मत आहे. त्यामुळे झोयाच्या नातेवाईकांनी दावा केलेला मृतदेह सोडून उर्वरित २४ मृतदेहांवर आज अंत्यविधी करण्यात येणार आहे. “त्या” मृतदेहाची डीएनए चाचणी केल्यानंतर तो मृतदेह झोयाचाच असल्याचे निश्चित झाल्यावर तो तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. मात्र, तसे निष्पन्न न झाल्यास त्यावर सुद्धा विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने ठरवण्यात आले.(Buldhana Accident News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातावेळी नेमकं काय घडलं याची माहिती घेतली. ‘झालेली घटना दुर्दैवी आहे, सकाळपासूनच आम्ही कलेक्टर, एसपी आणि आयजींच्या संपर्कात होतो. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात येते. लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आठ माणसं बाहेर निघाली आणि आठ जखमी झाली,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.(Buldhana Accident News)
समृद्धी महामार्गावरील अपघात चालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. सरकारने हे प्रकरण गांभिर्याने घेतलं आहे. सगळी यंत्रणा जागेवर पोहोचली; मात्र, दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही. अपघात होऊ नये म्हणून सरकारला काही करायला हवं ते सरकार करेल, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.(Buldhana Accident News)