पुणे : पाच वर्षापूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश आले आहे. एक खोली नावावर करण्याच्या वादातून २३ वर्षांच्या सख्ख्या लहान भावाचाच बहिण भावाने मित्राच्या मदतीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस हवालदार पोलीस हवालदार राजेंद्र मारणे (वय ५१) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बहिण-भाऊ व मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. तर मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पंकज चंद्रकांत दिघे (वय- २३, एरंडवणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर पंकजचा भाऊ सुहास चंद्रकांत दिघे (वय २९), बहिण अश्विनी आडसुळ व मित्र महेश बाबुराव धनावडे (वय ३७, शिवणे) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे असून महेश धनावडे याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघे कुटूंब एरंडवणा परिसरात राहत होते. पंकज सुहास व अश्विनी हे सख्खे बहिण भाऊ होते. पंकजच्या आईचे आजाराने निधन झाले आहे. पंकज काही काम करत नव्हता. तो राहत्या घरातील एक खोली माझ्या नावावर करा व आईला देखील तुम्हीच मारले असे म्हणत वाद करीत होता. त्यावरून सुहास व अश्विनी यांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला. मित्र महेश व प्रशांत यांच्या मदतीने पाच वर्षांपूर्वी (दि. १४ मार्च २०१७) सायंकाळी त्याला चौघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर महेशच्या चार चाकी गाडीमधून डेक्कनमधील कॅनोलमध्ये ढकलून देत त्याचा खून केला.
पाच दिवसानंतर (दि. १९ मार्च २०१७) डेक्कन पोलीसांकडे भाऊ सुहासने पंकज बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्याचा शोध देखील घेतला नाही. व पंकजचा मृतदेह कॅनोलने वाहून हडपसरमध्ये मिळून आला. त्याबाबत हडपसर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परंतु, त्याबाबत कोणच न आल्याने त्याचे शासकीय नियमानुसार अत्यंविधी केला गेला.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांना बातमीदारामार्फत पंकजसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्या कानावर ही बाब घालत तपासाला सुरूवात केली. प्रथम त्यांनी पंकजचे मिसींग कुठे दाखल आहे, याचा शोध घेतला. त्यांनतर डेक्कन येथे मिसींग असल्याचे समोर येताच मृतदेह कुठे आढळून आला का, याची माहिती घेण्यास सुरूवात केली. त्यांना हडपसरमध्ये मृतदेह आढळल्याचे समजले. त्याची खात्री पटवत पोलीसांनी तपासाला सुरूवात केली.
परिसरात फिरून माहिती घेतल्यानंतर घटना पाहिलेला एक प्रत्यक्षदर्शी देखील सापडला. त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर आरोपी महेश धनावडे याला ताब्यात घेऊन सखोल तपास केल्यानंतर त्याने घटनेची माहिती दिली. त्यांनतर या खूनाचा उलगडा झाला. पोलीस निरीक्षक अनिता मोरे व पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. हडपसरमध्ये दाखल असणाऱ्या एका इडीचा तपास केल्यानंतर पंकजचा मृतदेहाची ओळख पटविली. पंकजच्या एका हातावर आई आणि दुसऱ्या हातावर पंकज असे गोंदलेले होते. त्यावरून त्याचा मृतदेह ओळखला गेला.
दरम्यान, सुहासने महेशच्या खूनाचा देखील कट रचला होता. पंकजला मारल्याची माहिती त्याला होती अन त्यानेच त्याला कॅनोलमध्ये ढकलून दिले होते. महेशला मारल्यानंतर पुरावाच नष्ट होईल आणि प्रकरण कधीच समोर येणार नाही, असा त्याचा समज होता. त्यामुळे त्याने महेशला मारण्याचा कट रचला होता. ताम्हिणी घाटात पार्टीच्या निमित्ताने त्याला घेऊन देखील गेले होते. परंतु, तो डाव फसला गेला.