दिनेश सोनवणे
दौंड : सातबाऱ्यावरील ऑनलाइन ब्लॉक काढून देण्यासाठी ४ हजाराची लाच स्वीकारताना दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
तुषार वसंतराव शिंदे (वय – 34 पद – महसूल सहायक, वर्ग-3 तहसील कार्यालय ,दौंड, जि. पुणे) असे पकडण्यात आलेल्या महसूल सहाय्यकाचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने लाचलुतपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांची पुनर्वसित वाटप झालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील भोगवटा वर्ग २ हा शेरा कमी करून भोगवटा वर्ग १ या शेऱ्याची अंमलबजावणी करण्याकरिता आणि सातबाऱ्यावरील ऑनलाइन ब्लॉक काढून देण्यासाठी महसूल सहाय्यक तुषार शिंदे यांनी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंतिम शिंदे यांना ४ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महसूल सहाय्यक तुषार शिंदे याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.