हडपसर : मालकाच्या नकळत चालकाने चारचाकी गाडीतून १५ तोळे दागिने चोरून नेल्याची घटना हडपसर येथे नुकतीच घडली आहे. विशेष बाब म्हणजे घरातून दागिने चोरीला जातील म्हणून या भितीपोटी गाडी मालकाने गाडीत ठेवेले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सदर चालकास बेड्या ठोकल्या आहेत.
जमील अयुब शेख वय ४५ वर्ष रा. केदारी हाईटस फ्लॅट नं १०, ५ वा मजला, शिवाजी पतुळाजवळ, दापोडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीराव जनार्दनराव पाटील (वय- ७०,) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीराव पाटील हे पुणे मनपा पॅनलवर वकील आहेत. त्यांना कार्यक्रमानिमीत्त बिदर, कर्नाटक येथे जाण्याचे असल्याने ते घरात नसताना घरातील दागिने चोरी जातील या भितीने त्यांनी त्यांचे घरातील १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने प्रवासात सोबत घेतले होते. बिदर, कर्नाटक येथे जाण्यासाठी त्यांचा नेहमीचा ड्रायव्हर नसल्याने त्यांनी पर्यायी ड्रायव्हर जमिल शेख यास बोलावले व कर्नाटक येथे गेले. बिदर कर्नाटक येथुन कार्यक्रम उरकून पुण्यात आल्यावर दागिने ठेवलेली सुटकेस पाहीली असता, त्यामध्ये दागिने दिसले नाहीत. त्यानुसार दागिने चोरी गेल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती.
सदर घटनेचा तपास पोलीस करीत असताना पाटील यांच्याकडे संशयीत ड्रायव्हवर याचे कोणतेही फोटो अथवा इतर उपयुक्त माहीती नव्हती. तांत्रिक विश्लेषणातुन आरोपी हा दापोडी येथील रहीवासी असल्याचे दिसून आल्याने तपास पथक अधिकारी विजयकुमार शिंदे, अविनाश शिंदे आणि पोलीस अंमलदार शाहीद शेख, अविनाश गोसावी, सुरज कुंभार यांनी सलग दोन दिवस दापोडी भागात फिरून आरोपीबाबत कोणतीही उपयुक्त माहीती नसताना अगर फोटो नसताना, आरोपी जमील शेख याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.
दरम्यान, त्याचेकडे तपास केला असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ६ लाख ५० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. हडपसर तपास पथकाने मागिल ५ महिन्यात ६७ लाख रुपयांच्या मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणून सोने, मौल्यवान दागिने आणि वाहने मिळून ६७ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे यांचे पथकाने केली आहे.