यवत (पुणे) : दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे गणपती विसर्जनादरम्यान विहरीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर पाणबुड्याच्या सहाय्याने बाहेर काढण्यास यश आले आहे.
संकेत सहदेव म्हेत्रे (वय-२२, रा. बोरीऐंदी ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत व त्याचे मित्र बोरीऐंदी ग्रामपंचायत हद्दीतील एका विहरीत गणपती विसर्जन करण्यासाठी आज शुक्रवारी (ता.९) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते. विसर्जनानंतर सर्वजन विहरीच्या वरती आले. याचवेळी विहरीतून वर येत असताना, संकेतचा पाय घसरला. आणि तो विहरीमध्ये पडला. तो वरती आलाच नाही. मित्रांनी त्याचा शोध घेतला, परंतु संकेत मुलीन आला नाही.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच, यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, उप पोलीस निरीक्षक पदमराज गंपले, सुजित जगताप, पोलीस नाईक निखिल रणदिवे, पोलीस शिपाई दीपक यादव, तात्यासाहेब करे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर पाणबुड्याच्या सहाय्याने मृतदेह शोधण्यास यश आले आहे. या घटनेने दौंडसह बोरीऐंदी गावात शोककळा पसरली होती. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.