लोणी काळभोर (पुणे) : यवत पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (वय 43, रा. बारामती मूळगाव – लासुर्णे ता. इंदापूर) हे पायी जात असताना एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये कदम हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात बारामती-भिगवण रस्त्यावरील हॉटेल अभिषेकसमोर शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला. हा नेमका अपघात होता की घडवून आणलेला कट याबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिस खात्यातच याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
https://www.instagram.com/reel/Cxkzbz2Sio_/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
संदीप कदम हे शुक्रवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी घराबाहेर पडले होते. हॉटेल अभिषेक समोरील रस्त्यावरुन ते पायी जात असताना पाठीमागून आलेल्या पिवळ्या रंगाच्या तीनचाकी टेम्पोने कदम यांना पाठीमागुन जोरदार धडक दिली. यात ते रस्त्याच्या एका बाजूला फेकले गेले.
त्यामध्ये कदम यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना स्थानिकांनी बारामती शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर मार लागल्याने संदीप कदम यांना पुढील उपचारासाठी बारामतीहून पुण्यातील एका बड्या रुग्णालयात हलविले होते. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून संदीप कदम यांच्यावर उपचार सुरु आहेत.
इंदापुर तालुक्यातील लासुर्णे या गावचे रहिवाशी असलेल्या संदीप कदम यांनी बारामती शहर, जिल्हा (ग्रामीण) पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व लोणी काळभोर पोलिस ठाण्यात यापूर्वी कर्तव्य बजावले आहे. मागील तीन वर्षांपासून संदीप कदम हे यवत पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटस पोलिस चौकीत हवालदार म्हणून कार्यरत आहेत. संदीप कदम यवत पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत असून, त्यांनी आपल्या कौशल्याने अनेक गुन्ह्याची उकल केलेली आहे.
अपघात की घडवून आणलेला कट?
बारामती येथे दोन दिवसांपूर्वी व्यायामाच्यावेळी चालताना तीन चाकी टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. हे फुटेज पाहिल्यानंतर संदीप कदम यांचा अपघात की घडवून आणलेला कट याबाबतची चर्चा खुद्द पोलिस दलातच सुरु झाली आहे.
संदीप कदम यांनी एका गंभीर गुन्ह्यात पकडलेले काही आरोपी तुरुंगातून नुकतेच बाहेर आले आहेत. हे सर्व आरोपींनीच संदीप कदम यांचा अपघात घडवून आणली की काय अशी चर्चा पोलिस खात्यात मागील दोन दिवसांपासून सुरु आहे. तर दुसरीकडे या चर्चेची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही त्या दिशेने तपास सुरु केला आहे. याबाबतची माहिती जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’ला दिली आहे.
पोलिस दलातील ‘स्टाईल आयकॉन’
संदीप कदम यांना व्यायामाबरोबरच वेगवेगळ्या स्टाईलमध्ये सेल्फी व फोटो काढण्याचा मोठा छंद आहे. संदीप कदम यांचे फेसबुक अकाउंट पाहिल्यास त्यांच्या छंदाचा अंदाज येतो. पोलिस दलातील आपल्या सहकाऱ्यांबरोबरच संदीप कदम यांनी आपल्या मुला-मुलीबरोबरचे अनेक फोटो फेसबुकवर शेअर केल्याचे दिसून येते. तसेच पोलिस दलातील त्यांची कामगिरी पाहता ते ‘स्टाईल आयकॉन’ असल्याचाच अनुभव येतो. संदीप कदम यांच्या अपघाताची माहिती मिळताच अनेकांना धक्काच बसला आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊन ते बरे व्हावे, यासाठी जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील कदम यांच्या सहकाऱ्यांनी प्रार्थना सुरु केल्या आहेत.