विशाल कदम.
लोणी काळभोर, ता.०२ – घरगुती वापरासाठीचा (एलपीजी) गॅस सिलिंडर ग्राहकांना शासनाने निर्धारित केलेल्या किमतीला म्हणजेच ९०७ रुपयांना घरपोच देणे गॅस एजन्सींना बंधनकारक आहे. असे असतानाही हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यानच्या पूर्व हवेलीतील ग्राहकांना मात्र ९०७ रुपयांचा सिलेंडर ‘घरपोच शुल्क (होम डिलिव्हरी चार्ज) आकारणी’च्या नावाखाली ग्राहकांना ९५० ते ९७० रुपयांना विकत घ्यावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
महिलांना गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत व घरपोच नियमाबाबत अचूक माहिती नसल्याने गॅस वितरण एजन्सींनी ग्राहकांना घरपोच सिलेंडर देण्यासाठी नेमलेले मध्यस्थच महिलांकडून ‘घरपोच शुल्क (होम डिलिव्हरी चार्ज) आकारणी’च्या नावाखाली बेकायदा वसूली करत असल्याचे पुढे आले आहे. घरपोच सिलेंडर देण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा म्हणजेच ९०७ रुपयांपेक्षा कोणी अधिक पैशांची मागणी केल्यास संबंधित गॅस एजन्सींच्या विरोधात ग्राहकांनी 02026213105 या नंबरवर थेट फोन करुन तक्रार नोंदवावी, असे आवाहन हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किमतीत २०० रुपयांनी कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिल्यामुळे देशभरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीतील घरगुती गॅस ग्राहकांची ‘घरपोच शुल्क (होम डिलिव्हरी चार्ज) आकारणी’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची बाब पुढे आली आहे.
अनेक सबब पुढे करून उकळले जातात पैसे
हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत 50 हजारांहून अधिक घरगुती गॅस जोडणी (कनेक्शन) आहेत. या ग्राहकांना शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीला एलपीजी सिलिंडर घरपोच करणे बंधनकारक आहे. तशी जबाबदारीही शासनाने गॅस एजन्सी अर्थात वितरकावर घालून दिलेली आहे. मात्र, हडपसरपासून उरुळी कांचनपर्यंतच्या ग्राहकांना सिलेंडर घरपोच मिळवण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा 40 रुपयांपासून 90 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे उघड झाले आहे. महिला वर्ग घरी असल्याची संधी साधत गॅस सिलेंडर पोहोच करणारे ‘पहिला मजला…’, ‘दुसरा मजला…’ अशा सबब पुढे करुन अतिरिक्त शुल्क घेत असल्याच्या महिला वर्गाच्या तक्रारी आहेत. पण आता घरपोच शुल्क (होम डिलिव्हरी चार्ज) आकारणी केल्यास यापुढे वितरकांवर थेट कारवाई केली जाणार असून, तसा निर्णयच गॅस वितरण करणाऱ्या तीनही कंपन्यांनी घेतला आहे.
महिलांना किमतीबाबत अचूक माहिती नसल्याने होतीये फसवणूक
गॅस सिलेंडरच्या दरकपातीनंतर पुण्यात सिलेंडरची किंमत ९०६ अथवा ९०७ रुपये एवढी झाली आहे. मात्र, महिलांना अनेकदा नागरिकांना गॅस सिलेंडरची खरी किंमत माहिती नसल्याने आर्थिक फसवणूक होत आहे. पूर्व हवेलीत अनेक गॅस एजन्सी आहेत. त्या एजन्सीच्या माध्यमातून हजारो सिलेंडरचे रोज वितरण होत असते. जर एका सिलेंडरमागे ५० रुपये डिलिव्हरी चार्ज म्हणून आकारला जात असेल तर हजारो सिलेंडरमागे रोज ५० हजारहून अधिक रुपयांची ‘माया’ जमा होत आहे. असे जर असले तर मग तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर किती लूट होत असेल? हे न सोडवता येणारे एकप्रकारचे कोडेच आहे.
गॅसच्या वजनातही अनेकदा ‘गोलमाल’
एचपी, भारत व इंडियन ऑईल अशा या तीन कंपन्यांचे सिलेंडर वापरले जात आहेत. सध्या वापरत असलेला गॅस सिलेंडर अनेकदा योग्य आणि अचूक वजनाचा असेल की नाही याची शाश्वती तशी कोणालाच नसते. वास्तविक, भरलेला सिलिंडर त्याचे वजन 14.2 किलो अपेक्षित असते. त्यात टाकीचे वजन जर साधारणत: 15.8 असेल तर टाकी आणि भरलेला गॅस याचे एकूण वजन 30 किलो असणे गरजेचे आहे. ग्राहकांना सिलेंडर देण्यापूर्वी, त्याचे वजन ग्राहकांच्या समोर करुन सिलेंडरची डिलिव्हरी देणे बंधनकारक असते. मात्र, घरपोच करणारी ही मुले सर्रास वजन काटा जवळ बाळगत नसल्याचे पुढे आले आहे.
सीलबंद सिलेंडर मिळणेही कठीणच
घरपोच सिलेंडर येणारा हा अनेकदा सीलबंद येत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामध्ये कॅपवर लावलेले स्टिटर्स अर्थात सील फाटलेले किंवा अर्धवट लावलेले आढळून येते. याबाबत संबंधित डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला विचारणा केल्यावर ‘असाच मिळेल…’, ‘नंतर बदलून देतो…’, ‘गोडाऊनमधून घेऊन या…’ अशाप्रकारची उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अशाप्रकारची उत्तरे देणाऱ्या कामगारांवरही कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने जर लीक झालेला सिलिंडर दिला आणि तो वापरात आल्यास नंतर जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
ऑनलाईन तक्रारीला द्या प्राधान्य…
घरपोच सिलेंडर देण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा अधिक रकमेची मागणी कोणी करत असेल तर, संबंधित गॅस वितरकाच्या विरोधात तुम्हाला तक्रार करण्याचा पुरेपूर हक्क आहे. त्यासाठी सर्वप्रथम एजन्सीच्या ऑनलाईन पोर्टलला तक्रार करावी, कधीही कार्यालायात जाऊन तोंडी तक्रार करण्यात वेळ घालवू नये. तसेच ज्या कंपनीची एजन्सी आहे त्यांनी तक्रारींची दखल न घेतल्यास ‘पीजीपोर्टल’ या केंद्र सरकारच्या ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टलमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयास तक्रार करावी. तर दुसरीकडे अधिक पैशाची मागणी करणाऱ्या गॅस एजन्सींच्या विरोधात ग्राहकांनी 02026213105 या नंबरवर थेट फोन केला तरी संबंधितावर कारवाई केली जात आहे.
माहिती कंपनीकडून मागावी
याशिवाय, संबंधित घरगुती एलपीजी सिलेंडर पुरवठादाराविरोधात किती तक्रारी आल्या व त्यावर काय कारवाई झाली याची सविस्तर माहिती मूळ कंपनीकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागावी. ज्या कंपनीशी एजन्सी ही संलग्न असेल त्या कंपनीस सिलिंडर उशिरा दिल्यास त्यांच्या रँकिंग तपासण्यासंबंधी जरूर ऑनलाईन तक्रार करावी.
पोलिस ठाण्यातही देता येऊ शकेल तक्रार
कर्मचाऱ्यांची अरेरावी, जास्तीची बेकायदा शुल्काची मागणी व वसूली याचा पुरावा तयार करून स्थानिक पोलीस ठाण्यास फसवणुकीबाबतही तक्रार करता येऊ शकणार आहे. या लेखाची प्रिंटसोबत घेऊन एजन्सीकडे जावे म्हणजे योग्य ते संदर्भ देता येतील.
गॅस वितरक कंपन्यांनी वाजवी दरात सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत
सरकारने घरगुती वापरासाठी गॅस सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी केल्या आहेत. यामुळे थोडा दिलासा मिळणार होता. मात्र, गॅस वितरक एजन्सीने वाजवी किमतीपेक्षा जास्त दराने सिलिंडर विक्री केली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर काटकसर करून आर्थिक गणित जुळवत असतानाच हा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. गॅस वितरक कंपन्यांनी वाजवी दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.
– अनिता गायकवाड (गृहिणी, लोणी काळभोर)