पुणे, ता.०४ : महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याने कामाचे ना हरकत प्रमाणपत्र व मीटर चाचणीसाठी ठेकेदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चिंचवड येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यावर बुधवारी (ता.४) गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेंद्रकुमार साळुंखे (एमएसईडीएल, गणेश खिंड अर्बन, चाचणी विभाग कार्यालय, चिंचवड गांव, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय सोलर सिस्टिमच्या ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोलर सिस्टिमचे ठेकेदार आहेत. ते सोलर सिस्टिम बसवून देण्यासाठी ग्राहक व महावितरण यांच्यामध्ये लायझनिंगचे काम करतात. तक्रारदार यांनी ग्राहकाच्या घरी सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशनचे कामाचे ना हरकत प्रमाणपत्र / तपासणी अहवाल मिळण्यासाठी महावितरण कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. तक्रारदार हे स्वत: त्याचा पाठपुरावा करत होते.
राजेंद्रकुमार साळुंखे यांनी तक्रारदार यांच्याकडे सदरच्या कामाचे ना हरकत प्रमाणपत्र व मीटर चाचणीसाठी दहा हजार रुपयांची लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता राजेंद्रकुमार साळुंखे यांनी सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशनचे ना हरकत प्रमाणपत्र व मीटर चाचणीसाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी आरोपी राजेंद्रकुमार साळुंखे याच्याविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करत आहेत.