संदीप टूले
केडगाव, ता.१० : संस्थेच्या दोन वर्षांचा सक्षमीकरणाच्या प्रस्तावावरील शिफारसीकरीता साडेआठ हजाराची लाच स्वीकारताना केडगाव येथील सहकारी संस्थेच्या उपलेखापरिक्षका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सासवड (पुणे) येथील तहसिलदार कार्यालयाच्या समोरून सोमवारी (ता.०९) रंगेहाथ पकडले आहे.
रविंद्र ज्ञानेश्वर गाडे (वय ५१, पद उपलेखापरिक्षक (वर्ग-३), सहकारी संस्था, केडगांव, जिल्हा पुणे.) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ५६ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विकास सेवा सहकारी सोसायटीत सचिव म्हणून नोकरीस आहेत. सदर संस्थेमार्फत शेतक-यांना कर्ज देणे व कर्जाची वसुली करणे हे काम केले जाते. शेतक-यांकडून कर्जाची वसुली ५० टक्क्यापेक्षा जास्त असेल तर शासनाकडून ( सहकार खाते) संस्थेस अनुदान मिळते. त्याकरीता तालुका ऑडीटरकडून लेखापरिक्षण करणे आवश्यक असते. त्यामुळे तक्रारदार यांनी त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आरोपी रविंद्र गाडे यांच्याकडे दिला होता.
दरम्यान, आरोपी रविंद्र गाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या संस्थेचा सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या दोन वर्षांच्या सक्षमीकरणाच्या प्रस्तावावरील शिफारसीकरीता १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती आरोपी रविंद्र गाडे यांना साडेआठ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीचा खातीरजमा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सासवड (पुणे) येथील तहसिलदार कार्यालयाच्या समोर सापळा रचला. या सापळ्यात तक्रारदार यांच्याकडून साडेआठ हजाराची लाच स्वीकारताना आरोपी रविंद्र गाडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर आरोपी रविंद्र गाडे याच्या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.