पुणे : पुणे महानगरपालिकेतील एका व्यक्तीस एक लाख रूपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून, या कारवाईमुळे पुणे महानगरपालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रविण दत्तात्रय पासलकर (वय 50, बिगारी, पुणे मनपा, पुणे) असे लाच स्वीकारणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. यामध्ये तक्रारदार हे आरोग्य विभागातून मुकादम म्हणून 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या शिल्लक अर्जित रजेच्या रोखीकरणाचा बिलाचा चेक देण्यासाठी पुणे मनपातील प्रविण पासलकर याने एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. प्राप्त तक्रारीच्या आधारे एसीबीने गंभीर दखल घेत आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यात लाचेची रक्कम स्वीकारताना पासलकर यास रंगेहाथ पकडण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी संबंधिताविरूध्द शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.