जीवन सोनवणे
भोर, (पुणे) : सर्वत्र गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. त्यातच भोर शहरात गणपती आणण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून चोरटे पसार झाले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
भोर तालुक्यातील आंबाडे-मांढरदेवी मार्गावर चालू गाडीवरील एका महिलेची तर दोन महिलांची भोर शहरात पर्स हिसकावून अज्ञात चोरट्यांनी ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.१९) घडली. अज्ञात चोरट्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरव्या रंगाची नंबर प्लेट नसलेल्या बुलेटवरून दोन अनोळखी इसमांनी आंबाडे-मांढरदेवी मार्गावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरे समोर गाडीवरील वनिता आनंदा तुपे (रा.वरवडी) यांच्या हातातील पर्स पळवली. तर भोर शहरातील चौपाटी येथे सुवर्णा तानाजी माने (रा. बालेवाडी) यांच्याकडील पर्स तसेच हिना तोसीब शेख ( रा. शिवशक्ती नगर, सातारा) त्यांच्याकडील गुलाबी पर्स पळवून ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे तसेच रोख रक्कम लंपास केली.
गणेशोत्सव काळात लागोपाठ दोन दिवस चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अज्ञात इसमावर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, हवालदार उद्धव गायकवाड, वर्षा भोसले तपास करत आहेत.