सागर जगदाळे
भिगवण, (पुणे) : भिगवण परिसरात दुचाकी व ऊस कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या तीन चोरट्यांना भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील दोघेजण विधिसंघर्षीत बालक आहेत.
कृष्णा शिवाजी कांबळे (रा. खानोटा, ता. दौंड) व दोन विधिसंघर्षीत बालक असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ३ लाख ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १२) मध्यरात्री डाळज नं. २, (ता. इंदापुर) ग्रामपंचायत हद्दीतील ऊस तोड कामगार याचे कोपीचे बाहेर चार्जीगसाठी लावलेले मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत प्रमोद लक्ष्मण पानसरे, रा. डाळज नं. २ यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तसेच भिगवण शहरातुन वर्दळीच्या ठिकाणाहुन ३० ऑक्टोंबरला अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत जालींदर रामदास जाधव, रा. करमाळा, जि. सोलापुर यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर दोन्ही घटना गंभीर असल्याने सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सदर घटनेची माहिती देऊन गुन्हे शोध पथक यांना तात्काळ तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा आरोपी कृष्णा कांबळे व दोन विधिसंघर्षीत बालक यांनी केला आहे. त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हयातील एकुण ३ मोटारसायकल व चोरीस गेलेले १८ मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी ३ लाख ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम पोलीस हवालदार विजय लोडी, सचिन पवार, महेश उगले, सलमान खान, अंकुश माने, हसीम मुलाणी, अक्षय कुमार, रणजीत मुळीक यांचे पथकाने केली आहे.