पुणे : क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळण्यासाठी घेतलेले २८ लाख रुपये परत न केल्याने तरुणाचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लहू माने (वय ४०), विशाल अमराळे (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
निखिल उर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (वय ३२, रा. आईसाहेब बिल्डिंग, आंबेगाव खुर्द) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकणी निखिल याची पत्नी हर्षदा (वय २४ ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्याकडून निखील यांनी क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळण्यासाठी २८ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर निखील याने पैसे परत न दिल्याने केल्याने आरोपी चिडले होते.
सराईत गुन्हेगार माने याने निखिल यांना धमकावण्यास सुरूवात केली. त्यानंतर निखिलचे बिबवेवाडी भागातून अपहरण करुन त्याला डांबून ठेवले. त्याच्यावर शस्त्राने वार करुन खून केला.
दरम्यान, निखील यांच्या पत्नीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी माने आणि अमराळे यांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ करीत आहेत.