Beed Crime | बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात काही नराधमांनी एक शाळकरी मुलगा शेतातून गेल्याने बेदम मारहाण करून त्याचा गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. तसेच त्याचा मृतदेह शेतातील एका झाडाला टांगण्यात आला. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलाम मोहम्मद मुर्तुजा शेख ( वय १५, रा. नित्रुड, ता. माजलगाव बीड) असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे राहणार गुलाम मोहम्मद हा इयत्ता नववीत शिकत होता. मंगळवारी (ता. १८) गुलाम शेख त्यांची लहान बहीण सिमरन आणि छोटा भाऊ हुजैफा यांना घेऊन आजोबांच्या शेतात सरपण आणण्यासाठी जात होता. यावेळी आरोपी कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांनी गुलाम मोहम्मदला रस्त्यात गाठत तू आमच्या शेतातून का जातोस असे म्हणत गुलामला मारहाण करण्यास सुरूवात केली.
त्याला जमिनीवर पाडून लाकडे दांडक्याने जबर मारहाण केली. यानंतर त्यांनी गुलामने सरपणासाठी नेलेल्या ओढणीने त्याचा गळा आवळून तिघांनी त्याचा खून केला. या वेळी घाबरलेल्या गुलामच्या भाऊ आणि बहिणीने पळ काढत घर गाठले. घरच्यांनी तातडीने घटनास्थळी गेले. यावेळी पालखी महामार्गावरील नित्रुडपासून जवळच असलेल्या शेतात एका लिंबाच्या झाडाला गुलामचा मृतदेह आरोपींनी लटकावला होता.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगावला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime News : वर्गणीस्वरूपात खंडणी मागणाऱ्या चौघांना बेड्या ; दोन सराईतांचा समावेश