बार्शी, ता. 18 : बार्शी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत मॅफेड्रॉन (एम.डी.) सारख्या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांना गावठी पिस्तूल व इतर साहित्यांसह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आरोपींकडून पोलिसांनी तब्बल 13 लाख 2 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांना एका खबऱ्या कडून माहिती मिळाली की, परांडा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ स्वराज हॉटेलच्या समोर एक पांढऱ्या रंगाची एक चारचाकी संशयास्पद परिस्थितीत दिसून येत आहे.
मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार तात्काळ शहर पोलिसांच्या पथकाने कारला घेराव घातला व कारमधील तिघा इसमांना ताब्यात घेतले.
त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 20.04 ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.), एक गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वजन काटा, कार, रोख रक्कम व असा एकूण 13 लाख 2 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
दरम्यान, या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत कलम 8 (क), 22(ब), 29, भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 3, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे करत आहेत.
ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहायक फौजदार अजित वरपे, पोलीस शिपाई बाळकृष्ण दबडे, अमोल माने, श्रीमंत खराडे, बाबासाहेब घाडगे, पोलीस नाईक सागर सुरवसे, संगाप्पा मुळे, अंकुश जाधव, सचिन देशमुख, प्रल्हाद अकुलवार, सचिन नितनात, धनराज फत्तेपुरे, राहुल उदार, इसामिया बहीरे, रतन जाधव यांनी केली आहे.