सोलापूर : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिराळे पांगरी (ता. बार्शी जि. सोलापूर) येथील फटाका कारखान्यात झालेल्या भीषण अपघातातील मुख्य आरोपीच्या मुसक्या बार्शी पोलिसांनी तामिळनाडूत आवळल्या आहेत.
नाना शिवाजी पाटेकर (रा. गणेष नगर, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारीला शिराळे पांगरी (ता. बार्शी जि. सोलापूर) येथील फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला होता. फटाक्यांच्या स्फोटात एकुण ५ महिला मृत्युमुखी पडल्या होत्या, तर तीन महिला जखमी झालेल्या आहेत. त्यांवर उपचार सुरू आहेत. याबाबत पांगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात आजपर्यंत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तीनही संशयित आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य संशयित आरोपी नाना पाटेकर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. गुन्हा घडल्यापासुन तो आपले अस्तित्व लपवून तामिळनाडू राज्यात विविध जिल्ह्यात राहत असल्याची माहिती बार्शी पोलिसांना एका खबऱ्याने दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तामिळनाडु राज्यात जावुन कोईम्बतुर, मदुराई, शिवकाशी या जिल्हयातील माहिती मिळवली. संशयीत आरोपी नाना पाटेकर याचा ठिकाणा मिळाला.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने शिवकाशी (तामिळनाडू) येथे सापळा रचुन संशयीत आरोपी नाना पाटेकर यास ताब्यात घेतले. त्याला बार्शीतील न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
नाना पाटेकरला ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सुहास जगताप, एपीआय धनंजय पोरे, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, हरिदास पांढरे, समर्थ गाजरे, दिलीप थोरात, व मोरे, यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. या गुन्हयाचा तपास उपअधीक्षक जालिंदर नालकूल हे करीत आहेत.