Baramati | बारामती (पुणे) : महाविद्यालयीन तरुणीशी समाज माध्यमांवर मैत्री प्रस्थापित करून जवळीकता वाढवली त्यानंतर तरुणीचा विश्वास संपादन करत बळजबरीने साखरपुडा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नातेवाईकाचे आळंदीत लग्न असल्याचा बनाव करत तरुणीला आरोपी आळंदीत घेऊन आला त्यानंतर शितपेयातून गुंगेचे औषध देऊन जबरदस्ती साखरपुडा केला. त्यानंतर तिला मारहाण करत तिच्याकडील दागिने काढून घेत सात दिवस डांबून ठेवले. बारामतीतील तालुक्यात हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर १९ वर्षीय तरुणीने पोलीसात धाव घेतली आहे.
याप्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात किरण झेंडे (रा. राशिन, ता. कर्जत, जि. नगर), सतीश राखपसरे (रा. काटेवाडी, ता. बारामती) व सागर लोंढे (रा. पिंपरी-चिंचवड) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने याबाबत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार पीडीतेची व आरोपी किरण या दोघांची ओळख समाज माध्यमांवर झाली. त्यानंतर यांच्यात मैत्री झाली. दरम्यान आरोपी किरणने तरुणीचा विश्वास संपादन करुन त्याचा गैरफायदा घेतला.
पुण्यात आळंदीमध्ये नातेवाइकांच्या लग्नाला जायचे खोटे नाटक करत तरुणीला किरण त्याचा दाजी सतीश आळंदीत २६ एप्रिल रोजी घेऊन आला. आळंदीत आल्यावर तरुणीने पाणी मागितले असता त्याने गुंगीचे औषध टाकून शीतपेय दिले. त्यानंतर तिला भोवळ आली. या स्थितीतच तिला एका मंगल कार्यालयात नेले. तेथे झेंडेने तिच्यासोबत फोटो काढले.
नंतर तरुणीला चिंचवड येथे सागर याच्या घरी नेले. तेथे बंद खोलीत तिला मारहाण केली. तू नशेमध्ये असताना तुझ्यासोबत साखरपुडा केला असून, आपण दोन, तीन दिवसांत लग्न करणार असल्याचे झेंडेने सांगितले. तिच्याकडील मोबाईल, गळ्यातील सोनसाखळी, कानातील दागिने काढून घेतले. सात दिवस तिला डांबून ठेवले.
दरम्यान, इकडे माळेगाव पोलिस ठाण्यात ती हरविल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!