बारामती : सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारात जखमी असलेले फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रात्री २ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे व फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीच्या सुंदर नावाच्या बैलाचा घेवाण देवाणचा व्यवहार होता. त्यामुळे रणजित निंबाळकर हे गुरुवारी (ता. 27) निंबुत येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी व्यवहारातून तुझं माझं होऊन झालेल्या भांडणातून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांचेकडून गोळीबार करण्यात आला.
या गोळीबारात निंबाळकर यांना सुरुवातीला बारामती येथे व त्यानंतर पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचरादरम्यान त्यांचा शुक्रवारी (ता. 28) रात्री २ वाजता मृत्यू झाला आहे. दरम्यान रणजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम शहाजीराव काकडे, गौरव शहाजीराव काकडे व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.