Baramati Crime | बारामती, (पुणे) : फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये या कारणासह अन्य कारणांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या तिघांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका विवाहितेने तक्रार दिली आहे.
पती अनिकेत अनिल तापोळे, सासू अनिता अनिल तापोळे (रा. जवाहनरगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) व नणंद कीर्ती चैतन्य लोटके (रा. कर्वेनगर, पुणे) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत निकिता अनिकेत तापोळे (सध्या रा. बारामती) या महिलेने बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत तापोळे व निकिता यांचा विवाह हा २०२१मध्ये रीतरिवाजाप्रमाणे इचलकरंजी येथे झाला. विवाहानंतर एक महिना सर्व व्यवस्थित सुरू होते. त्यानंतर सासूने तिच्याशी भांडण्यास सुरुवात केली. नणंद माहेरी आल्यानंतर ती अनेकदा तिला टोचून बोलत असे. याबाबत फिर्यादी पतीशी बोलल्यानंतर त्याने तिची समजूत काढली.
ऑगस्ट २०२२ मध्ये किरकोळ कारणावरून पती व सासूने तिला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फिनेल पाजण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने वडिलांना ही बाब कळविल्यावर त्यांनी तिला माहेरी आणले. त्यानंतर फिर्यादी तीन महिने माहेरीच राहिली.
या काळात पतीने तिला एकदाही फोन केला नाही. उलट, नांदण्यास येण्यासाठी वकिलांमार्फत नोटीस पाठवली. फिर्यादीनेही वकिलांमार्फत नोटिसला उत्तर दिले.
दरम्यान, नोव्हेंबर २०२२ मध्ये महिला तक्रार निवारण समितीसमोर त्यांची पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. तेथे दोघांमध्ये समेट घडवून आणतलेखी घेतल्यावर फिर्यादी पुन्हा नांदण्यात गेली. त्यानंतर काही दिवस ठीक चालले. परंतु पुन्हा पती व सासूने मारहाण करून शिवीगाळ केली. नणंदेने तिच्या पतीला हिला बाहेर काढ, असा सल्ला दिला.
३ एप्रिल २०२३ रोजी पतीने पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी वडिलांकडून पैसे आण, अशी मागणी केली. फिर्यादीने नकार दिला असता तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर ती माहेरी निघून आली.