नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील सिद्धिविनायक बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल ३ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओझर पोलीसांनी याप्रकरणी रोखपालासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बँकेचे सीए तुषार पगार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन कोटीहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बँकेचे रोखपाल दिनेश शौचे, वृंदा शौचे, सचिन इंगळे, प्रवीण अहिरे, महेश शेळके, प्रमोद जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील सिद्धिविनायक बँकेचे लेखापाल दिनेश शौचे यांनी वेळोवेळी पतसंस्थेत ३ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम आपल्या अधिकाराचा गैरवापर करून दुसरीकडे वळविली होती. ही बाब बँकेच्या वर्तुळात आणि पोलिसांत गेल्याने त्यांनी या रकमेची जमावाजमव करण्यास सुरुवात केली होती.
सिद्धिविनायक बँकेचा घोटाळा खरंतर जुलै महिन्यामध्येच उघड झाला होता. त्यामुळे ओझरच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.
बँकेतील हा घोटाळा ऐकून ठेवीदार यांच्यामध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून अनेकांनी ठेवी काढून घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. यावेळी बँकेकडून बँकेची स्थिती चांगली असून घाबरु नये असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास ओझर पोलीस करीत आहेत.