ढाका : बांगलादेशात बुधवारी (दि. 28 ऑगस्ट ) तलावाच्या काठावर 32 वर्षीय महिला पत्रकाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बांग्लादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर हिंसाचाराचे अनेक गुन्हे घडले. यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. न्यूज एंकर सारा रहनुमाचा अशा स्थितीत झालेला मृत्यू धक्कादायक बाब आहे. पण त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे या मृत्यूमागच रहस्य आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तपासाआधी मृत्यूच्या कारणाबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. साराची हत्या करण्यात आली आहे असा तिच्या कुटुंबाने आरोप केला आहे. मृत्यूआधी सारा रहनुमाने तिच्या फेसबुक पोस्टवरुन दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे मृत्यूच रहस्य अधिक गडद झालं आहे. या प्रकरणात पतीबद्दलची साराची नाराजी, तिचा एक मित्र आणि चॅनलचा मालक असे सगळेच आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बुधवारी सायंकाळी एका प्रवाशाने साराचा मृतदेह तलावाच्या किनाऱ्यावर तरंगताना पाहिला. त्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढला आणि तिला ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात (DMCH) नेले. जिथे पहाटे 2:00 च्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
32 वर्षीय सारा कल्याणपूर, ढाका येथील रहिवासी होती आणि गाजी टीव्हीमध्ये न्यूजरूम एडिटर म्हणून काम करत होती. ती नोआखलीच्या सोनईमुरी उपजिल्ह्यातील इस्लाम बाग कृष्णपूर गावातील रहिवासी बख्तियार सिकंदर यांची मुलगी होती. त्यांच्या मृत्यूमागे हत्येचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
साराने मृत्यूच्या आदल्या रात्री फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे, “त्यात तिने मित्र फहीम फैसलला टॅग केलं आहे. काही फोटो पोस्ट केलं आणि त्यात मेसेजही लिहिला. “तुझ्यासारखा मित्र असणं ही खूप चांगली गोष्ट होती. देव नेहमीच तुझ भलं करो. तू लवकरच तुझी सर्व स्वप्न पूर्ण करशील अशी अपेक्षा आहे. आपण सोबत मिळून प्लानिंग केलं होतं. माफ कर, त्या सर्व योजना आपण पूर्ण करु शकणार नाही. ईश्वर तुला आयुष्यात यश देईल” पोस्टच्या अखेरीस दोन हार्टचे इमोजी सुद्धा साराने टाकले होते.
पोस्टमध्ये काय म्हणाली सारा?
या पोस्टपूर्वी त्यांनी आणखी एका पेस्टमध्ये लिहिले होते. “जिवंत प्रेत बनून जगण्यापेक्षा मरण बरे. त्याच्या मृत्यूच्या आजूबाजूची परिस्थिती रहस्यमय वाटते. तिच्या कुटुंबीयांनी असेही सांगितले की ती फक्त ऑफिसच्या वाहनाने ऑफिसमधून परत यायची, परंतु मंगळवारी रात्री ती मित्राच्या बाईकवरून ऑफिसमधून निघाली.
डीएमसीएच पोलिस चौकीचे प्रभारी निरीक्षक मोहम्मद बच्चू मिया यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी डीएमसीएच शवागारात पाठवण्यात आला आहे.
साराच्या नवऱ्याने काय सांगितलं?
साराचं तिच्या नवऱ्याबरोबर पटत नव्हतं. तिचा नवरा सईद शुवरेने सांगितलं की, “7 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. अलीकडे त्यांच्यामध्ये कुठलं भांडण झालं नव्हतं. दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला”