Pune News : पुणे : कोरियन यूट्यूबर तरुणीशी छेडछाड करणाऱ्या आरोपीला वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
भरत करणराव हुनुसनाळे (२९, रा. रावेत मुळ रा. कर्नाटक) असे जामीन झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर रावेत पोलिसांनी विनयभंग तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. नितीन भालेराव यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात एक कोरियन तरुणी भारतात फिरण्यासाठी आली होती. रावेतमधील भोंडवे कॉर्नर येथे खरेदीसाठी गेली असता ती मोबाईलद्वारे चित्रिकरण करत होती. एका फळाच्या दुकानात काम करणारा भरत हुनुसनाळे याने कोरियन तरुणीसोबत तिच्या गळ्यात हात घालून फोटो काढत गैरवर्तन केले होते. या प्रकाराने कोरियन तरुणी चांगलीच घाबरल्याचेही दिसून आले होते.
याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी याची दखल घेऊन गुंडा विरोधी पथकाने तरुणाला अटक केली होती. आरोपीस वडगाव येथील न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले होते.
दरम्यान, आरोपी भारत हुसंनाळे याने ॲड. नितीन भालेराव यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आरोपीने कुठलाही गुन्हा केला नसून केवळ परदेशी नागरिकासोबत फोटो काढण्याच्या कुतूहलाने आरोपी महिलेजवळ गेला होता. केवळ व्हिडिओ ब्लॉगवर दाखल केल्यावर काही लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढून हा गुन्हा दाखल झाला असल्याचे आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आरोपी व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अग्रवाल यांच्या कोर्टाने या आरोपीला जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहेत. यासाठी ॲड. मयूर चौधरी, ॲड. दीपक खेडकर यांनी मदत केली.