पुणे : बारामती शहरात एका तरुण आणि उच्चशिक्षित मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिचा होणारा पती अथर्व राजेंद्र मेहन (वय 27, रा. बारामती) याच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता’ कलम 106(1) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकी घटना काय घडली?

मयत तरुणीने बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ती पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती. डिसेंबर 2025 मध्ये तरुणीच्या आणि अथर्वच्या प्रेमसंबंधांबद्दल तिच्या घरच्यांना माहिती मिळाली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी भेट घेऊन 12 एप्रिल 2026 रोजी त्यांचा विवाह करण्याचे निश्चित केले होते.

मात्र, घटनेच्या काही दिवसांपूर्वी मुलीच्या वर्तनात बदल दिसून आला होता. आईने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता, अथर्व तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता आणि तिला काही गोळ्या देत असल्याची माहिती समोर आली.6 ऑगस्ट रोजी दुपारी अथर्व तरुणीला प्रवेशाच्या कामासाठी कारने घेऊन गेला. सायंकाळी आईशी फोनवर बोलताना मुलीने, अथर्व तिला घरी घेऊन जात असून गोळी देणार असल्याचे सांगितले. आईने तिला तातडीने घरी येण्याचा सल्ला दिला होता.
रात्री 10 वाजताच्या सुमारास अथर्वने फोन करून मुलीला चक्कर आल्याची माहिती तिच्या आईला दिली. तिला तातडीने बारामतीतील सिल्वर जुबली रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मुलीच्या आईने अथर्ववर संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तरुणीला कोणती गोळी दिली होती का आणि तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलीस वैद्यकीय व फॉरेन्सिक पुराव्यांची तपासणी करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







