पुणे : नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या हॉटेल्स आणि बेकऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. पुणे शहरासह परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या. तपासणीमध्ये काही आस्थापनांमध्ये अस्वच्छ वातावरण, नियमांचे उल्लंघन आणि मुदत संपलेले अन्नपदार्थ साठवून ठेवल्याचे समोर आले. या प्रकरणांची गंभीर दखल घेत प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्या 12 आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी निलंबित केली आहे.

कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये लोणावळ्यातील द लोटस रिसॉर्ट, बिबवेवाडी येथील द मसल फूड्स बेकरी, पिंपरी-चिंचवडमधील हुमा बेकरी आणि आंबेगाव बुद्रुकमधील न्यू महाराष्ट्र बेकर्स यांचा समावेश आहे.

याशिवाय पर्वती परिसरातील माराकेश व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच वारजे जकात नाक्याजवळील स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनांवरही प्रशासनाने कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील नियमांचे पालन न केल्याचे तपासणीत आढळल्याने संबंधित आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्रशासनाने विविध ठिकाणांहून पॅकबंद अन्नपदार्थांसह इतर साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1.5 लाख रुपये असल्याची माहिती आहे.

अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छता राखणे, योग्य पद्धतीने साठवणूक करणे आणि ग्राहकांना सुरक्षित खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे ही व्यावसायिकांची जबाबदारी आहे. मात्र काही ठिकाणी या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रशासनाच्या तपासणीत दिसून आले.
दरम्यान, पुणे विभागात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तपासणी मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.







