मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना गट-अ अर्थात ‘मॅग्मो’ (MAGMO) च्या मागण्यांचा सविस्तर अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी १० सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार ही समिती गठीत करण्यात आली असून, याबाबतचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव दीपक केंद्रे यांनी जारी केले आहेत.

यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि मॅग्मो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर या मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार सोमवारी (ता. २३ नोव्हेंबर) समितीची स्थापना करण्यात आली.
आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर हे या समितीचे अध्यक्ष असतील. आरोग्य सेवा (अर्थसंकल्प व प्रशासन) सहसंचालक आर. बी. भालेराव यांच्याकडे सदस्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव दीपक केंद्रे, धाराशिवचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, राज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राचे (SHSRC) कार्यकारी संचालक डॉ. रामजी आडकेकर यांचा समावेश आहे.
तसेच मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. राहुल कन्नमवार, सरचिटणीस डॉ. संतोष हिंदोळे, राज्य मॅग्मोचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. संदीप गेडाम आणि सहसचिव डॉ. संघर्ष राठोड व डॉ. मोहन बच्छाव हेही समितीचे सदस्य असतील.
ही समिती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांचा सखोल अभ्यास करून शासनाला शिफारशी सादर करणार आहे. पहिली मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित करण्याबाबत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निश्चित कामकाजाची वेळ ठरवण्याच्या मुद्द्याचा समिती अभ्यास करणार आहे.
दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे डायनॅमिक अश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन (DACP) योजना. केंद्र सरकार आणि इतर राज्यांमध्ये लागू असलेल्या या योजनेचा अभ्यास करून ती महाराष्ट्रात सुरू करण्याबाबत समिती शिफारस करणार आहे.
तिसरी मागणी वैद्यकीय अधिकारी गट-अ कल्याण निधी योजनेशी संबंधित आहे. या योजनेचा सविस्तर अभ्यास करून तिची रचना, कार्यकक्षा आणि अंमलबजावणीची पद्धत निश्चित करण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे.
समितीने अभ्यास पूर्ण करून आपला अहवाल शासनाला सादर करायचा आहे. त्यानंतर आरोग्य सेवा आयुक्तांनी या अहवालावर आपले स्पष्ट अभिप्राय नोंदवून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.
या समितीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे तास, करिअरमधील प्रगती आणि कल्याण निधी यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार होणार आहे. त्यामुळे समितीच्या शिफारशींकडे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.






