हिंजवडी : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात २७ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोमल राजेंद्र डहाके (वय २७, मूळ रा. वर्धा, सध्या रा. साखरे पीजी, हिंजवडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती विप्रो कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. या प्रकरणी तिचा प्रियकर आणि इन्फोसिस कंपनीत कार्यरत असलेला सॉफ्टवेअर इंजिनिअर शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोमल डहाके आणि शुभम काळबांडे यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर झालेल्या मारहाणीत कोमलचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शुभमने कोमलला हाताने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, तसेच मारहाण कुठे आणि कशा प्रकारे झाली, याचा तपास सुरू आहे.
कोमलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे वैद्यकीय अहवालाकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी संशयित प्रियकर शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याला अटक करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण, वादाची पार्श्वभूमी आणि मृत्यूशी संबंधित परिस्थिती यांचा तपास पोलीस करत आहेत.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे हिंजवडी परिसरासह आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.






