लोणी काळभोर, ता. 23 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने प्रवास करून पुण्याकडे घरी परतत असताना चालकाला अचानक डुलकी लागल्याने भरधाव कारने सेवा रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील 56 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. 23) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात घडली.

शिवाजी सखाराम वजगे (वय 56, रा. तळेगाव ढमढेरे, मावळ, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वजगे कुटुंबीय सोलापूर येथून सेंट्रो कारने पुण्याच्या दिशेने घरी परतत होते. कार शिवाजी वजगे यांचा मुलगा चालवत होता. पहाटेच्या सुमारास त्यांची कार लोणी काळभोर परिसरातील माळी मळा येथे आली असता, चालकाला अचानक डुलकी लागली. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून कार सेवा रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या चालकाच्या शेजारील बाजूचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात शिवाजी वजगे गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, पोलीस अंमलदार अंकुश घुले, योगेश उदमले, दीपक गायकवाड, किरण गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी वजगे यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.






