पुणे : राज्यात अपघातांच्या विविध घटना समोर आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर शिवाई बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत नाझरे येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. महेंद्र नाझीरकर आणि रेश्मा नाझीरकर अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या प्रकरणी शिवाई बसचालकाविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी-मोरगाव मार्गावर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शिवाई बस आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील महेंद्र आणि रेश्मा नाझीरकर गंभीर जखमी झाले. मात्र, या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नाझरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, मुंबईतील दहिसर पूर्व परिसरातही अपघाताची घटना घडली आहे. दहिसर पोलीस ठाण्याजवळील मानव कल्याण हॉस्पिटल सिग्नलवर भरधाव डंपरने एका महिलेला धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला. जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार डंपरचालकाचा शोध सुरू आहे.

ठाण्यातील मुंब्रा-ठाणे मार्गावरील रेतीबंदर रोड येथे कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. काल रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी हा अपघात घडला. अरिस कुरेशी (वय १८) आणि इरफान अन्सारी अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस तपास करत आहेत.






