पनवेल: पनवेल आणि बदलापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरील या मार्गाचा महत्त्वाचा भाग असलेल्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सुमारे 4 किलोमीटर लांबीच्या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा पूर्ण झाला असून, दुसऱ्या बोगद्याचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेगाने सुरू असून, डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.

माथेरान डोंगररांगांमधून जाणारा हा बोगदा पनवेल आणि बदलापूर या दोन महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. सध्या या दोन्ही ठिकाणांदरम्यानचा प्रवास करण्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र, नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर सुमारे 38 किलोमीटरचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पार करता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांचा जवळपास एक तास वाचू शकतो.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा हा टप्पा देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे. हा संपूर्ण महामार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी लागणारा 22 ते 24 तासांचा कालावधी कमी होऊन 12 ते 14 तासांवर येण्याची अपेक्षा आहे.

या मार्गाचा फायदा केवळ खासगी वाहनचालकांनाच नव्हे, तर जेएनपीटी बंदरातून होणाऱ्या मालवाहतुकीलाही होणार आहे. सध्या कंटेनर वाहने नवी मुंबई, ठाणे आणि भिवंडी परिसरातून जातात. नवीन बोगदा सुरू झाल्यानंतर अवजड वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे पनवेल, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि भिवंडी भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळू शकते.
सुमारे 1 लाख कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पॅकेज 17 मध्ये या बोगद्याचा समावेश आहे. काम नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास प्रवासासह मालवाहतुकीलाही मोठी गती मिळणार आहे.






