अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : कोरेगाव भीमा गावातील शांतता सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामस्थ आणि पोलिस प्रशासनाने एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे असून गावातील शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना कोणताही थारा दिला जाणार नाही कायद्याचा भंग करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही असा कडक इशारा शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.
कोरेगाव भीमा येथे ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाढते औद्योगिकीकरण, कंपन्या व गोदाम व्यवसायातून निर्माण होणारे वाद, कामगारांच्या समस्या, गुन्हेगारीला प्रतिबंध आणि अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना यादव म्हणाले की, कोरेगाव भीमा हा सधन आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असलेला परिसर असून उद्योग-व्यवसाय वाढत असताना परस्परांतील विश्वास, सुसंवाद आणि कायद्याचे पालन महत्त्वाचे आहे कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करणाऱ्यांना पोलिसांचे सहकार्य राहील मात्र दादागिरी, गुंडगिरी आणि गुन्हेगारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
गोदाम व्यवसायासाठी जागा भाड्याने देताना संबंधित कंपन्या व व्यक्तींची विश्वासार्हता तपासावी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये संशयास्पद हालचाली किंवा अडचणी आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन सामान्यांना न्याय देण्याचे काम पोलीस प्रशासन करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात मोक्का आणि एमपीडीएसारख्या कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये गावातील वादविवाद वाढू न देता प्रत्येकाने संयम, संवाद आणि एकोप्याची भूमिका घ्यावी मतभेद असू शकतात मात्र मतभेद निर्माण होऊ देऊ नयेत.
गाव हे एका कुटुंबाप्रमाणे असून गावपण टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले
दरम्यान कामगार नेते अविनाश देवकर यांनी औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या वेतन कपातीचा आणि आर्थिक शोषणाचा मुद्दा उपस्थित केला काही ठिकाणी एचआर विभाग व कंत्राटदारांच्या संगनमतातून कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गर्दीच्या वेळी वढू चौक वाहतुकीसाठी बंद ठेवण्याबाबत चर्चा झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांनी प्रभावी वाहतूक नियोजनासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले.






