न्हावरे: मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक तमाशा लोककलेसमोर मोठे संकट उभे राहिले असून, तमाशा मंडळे अक्षरशः अखेरची घटका मोजत आहेत. ही समृद्ध लोककला टिकवायची असेल, तर रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने तमाशाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तमाशा ही लोककला जिवंत ठेवण्याची जबाबदारी रसिकांनी स्वीकारावी, असे आवाहन पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी केले.

न्हावरे (ता. शिरूर) येथे एका कार्यक्रमादरम्यान ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना खेडकर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, मोबाईल आणि आधुनिक मनोरंजनाच्या साधनांमुळे पारंपरिक तमाशाकडे प्रेक्षकांची ओढ कमी होत चालली आहे. त्यामुळे अनेक तमाशा मंडळांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तमाशा ही केवळ करमणुकीची कला नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा वारसा आहे. या कलेमध्ये अनेक कलाकारांचे आयुष्य आणि कुटुंब अवलंबून आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी गावागावांतील यात्रा, जत्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तमाशा मंडळांच्या कार्यक्रमांसाठी आग्रह धरावा. तमाशाला उपस्थित राहून कलाकारांचे मनोबल वाढवावे. अन्यथा येणाऱ्या काळात ही पारंपरिक लोककला टिकवणे कठीण होईल, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंडळाचे मालक असलेल्या पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या या आवाहनामुळे महाराष्ट्राच्या लोककलेच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






