सागर जगदाळे

भिगवण, ता. २३ : दिवसभर ऊस तोडून उदरनिर्वाहासाठी घाम गाळणाऱ्या मजुरांसाठी उसाचे शेतच आता धोक्याचे ठिकाण ठरू लागले आहे. दाट उसाच्या पानाआड दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक समोर येत एका ऊसतोड मजुरावर हल्ला केला. क्षणात मृत्यू समोर उभा ठाकला असताना हातातील कोयताच या मजुराच्या बचावासाठी धावून आला. प्रसंगावधान राखत मजुराने बिबट्याचा प्रतिकार केल्याने त्याने घटनास्थळावरून पळ काढला आणि सुदैवाने मजुराचे प्राण वाचले. भिगवण परिसरात रविवारी घडलेल्या या घटनेने वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शंकर कैलास मोरे (रा. शनी देवगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी ऊसतोड मजुराचे नाव आहे. रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास भिगवणजवळील जाधव वस्ती येथील आशिष गुणवरे यांच्या उसाच्या शेतात ही घटना घडली.

सध्या परिसरात ऊसतोडणीचा हंगाम सुरू असल्याने अनेक मजूर शेतांमध्ये काम करत आहेत. गुणवरे यांच्या शेतातही ऊसतोड सुरू असताना शंकर मोरे हे नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होते. दाट उसाच्या पिकात लपून बसलेल्या बिबट्याच्या अस्तित्वाची त्यांना कोणतीही कल्पना नव्हती. अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. अनपेक्षित हल्ल्यामुळे काही क्षण गोंधळ उडाला; मात्र संकट ओळखताच मोरे यांनी हातातील कोयत्याने बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. मात्र, कोयत्याचा प्रतिकार आणि मजुराचा आक्रमक पवित्रा पाहून बिबट्याने तेथून पळ काढला.
या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि ऊसतोड मजुरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊसाच्या दाट पिकात वन्यप्राणी लपून बसण्याची शक्यता असल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी शेतात काम करणाऱ्या मजुरांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. सोमवारी वनविभागाचे पथक संबंधित परिसरात पाहणी करून बिबट्याचा माग काढणार असून, त्यासाठी शोध व बचाव मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बिबट्याचा वावर नेमका एका शेतापुरता मर्यादित आहे की परिसरातील अन्य भागांतही त्याची हालचाल आहे, याचा शोध घेणे आता वनविभागासमोर आव्हान ठरणार आहे. ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






