नवी दिल्ली : प्रवासात किंवा घराबाहेर असताना पिण्यासाठी अनेकजण बाटलीबंद पाण्याचा वापर करतात. त्यात बिस्लेरी या प्रसिद्ध ब्रँडवर ग्राहकांचा मोठा विश्वास आहे. मात्र, आता याच कंपनीच्या पॅकबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बिस्लेरी कंपनीविरोधात न्यायालयीन खटला चालवण्यास परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिस्लेरीच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या तपासणीत पाण्यामध्ये ब्रोमेट (Bromate) या रासायनिक घटकाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. हा घटक संभाव्य कर्करोगकारक मानला जातो. कंपनीने या निष्कर्षाला आव्हान दिल्यानंतर नमुना पुन्हा तपासणीसाठी रेफरल फूड लॅबमध्ये पाठवण्यात आला. मात्र, तेथील तपासणीतही पाण्यात पॉलीन्यूक्लियर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) हे घटक आढळल्याची माहिती आहे.
दोन्ही तपासण्यांमध्ये नमुना असुरक्षित ठरल्याने अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या प्रकरणात न्यायालयात काय घडते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, FSSAI ने उर्मी लाईफ सायन्सेस एलएलपी आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर यांचे परवाने रद्द केले आहेत. तसेच वसंत मसाला, टीआयटी-बीआयटी फुडस इंडिया, मिमान्सा इंडस्ट्रीज आणि आशा कन्फेक्शनरी या कंपन्यांविरोधातही न्यायालयीन खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. या घडामोडींमुळे पॅकबंद खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.






