लोणी काळभोर, ता. २२ : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासह पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत आरोपी हा तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून लोणी स्टेशन परिसरात रविवारी (ता. 22) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

फिरोज मोहम्मद शेख (वय 30, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस उपायुक्त, परिमंडळ पाच यांनी 7 एप्रिल 2025 रोजी आदेश काढून फिरोज शेख याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये दोन वर्षांसाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले होते. मात्र, तडीपारीचा आदेश लागू असतानाही तसेच कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची अथवा न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता फिरोज शेख हा रविवारी (ता. २२) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लोणी स्टेशन येथील बुस्टन टी हॉलच्या पाठीमागील आडोशाला आढळून आला. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक भागवत गिरी यांनी त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे नंदकुमार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे, सोमनाथ नाळे, पोलीस हवालदार अण्णा माने, निलेश कोल्हे , पोलीस आमदार अशोक गिरी, सचिन सोनवणे, प्रवीण दडस, गणेश खरात, सागर गायतोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.






