मुंबई: घरगुती LPG गॅस सिलेंडरचे ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या आणि सबसिडीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना सायबर गुन्हेगारांकडून लक्ष्य केले जात आहे. गॅस सबसिडी बंद होईल किंवा KYC प्रक्रिया अपूर्ण आहे, अशी भीती दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. बनावट फोन, WhatsApp मेसेज, लिंक आणि APK फाइल्सच्या माध्यमातून मोबाईलमधील माहिती चोरून बँक खात्यातील पैसे लंपास करण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ICICI बँकेने ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

सायबर गुन्हेगार स्वतःला गॅस एजन्सीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून ग्राहकांना फोन करतात. तुमची KYC प्रक्रिया अपूर्ण आहे आणि ती तातडीने पूर्ण केली नाही, तर गॅस सबसिडी बंद होईल, असे सांगून नागरिकांवर दबाव टाकला जातो. यानंतर WhatsApp किंवा SMS द्वारे बनावट लिंक किंवा APK फाइल पाठवली जाते. नागरिकांनी अनोळखी APK फाइल डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यास मोबाईलमध्ये मालवेअर प्रवेश करू शकतो. यामुळे फोनमधील वैयक्तिक माहिती आणि बँकिंगशी संबंधित तपशील सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याचा धोका असतो. या माहितीचा वापर करून बँक खात्यातील रक्कम लंपास केली जाऊ शकते.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी गॅस सबसिडी किंवा KYC अपडेटच्या नावाने आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही व्यक्तीला OTP, ATM PIN किंवा CVV क्रमांक सांगू नये. WhatsApp किंवा SMS वर आलेल्या अनोळखी APK फाइल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नयेत. गॅस बुकिंग आणि KYC प्रक्रियेसाठी संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत ॲप किंवा वेबसाइटच वापरावी. तसेच गॅस एजन्सी किंवा बँकेचा कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास न ठेवता संबंधित संस्थेकडून अधिकृत माध्यमातून माहितीची खातरजमा करावी.

चुकून सायबर फसवणुकीला बळी पडल्यास घाबरून न जाता तातडीने राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी. वेळ न दवडता तक्रार केल्यास संबंधित यंत्रणांना पुढील कारवाई करण्यास मदत होऊ शकते.






