पुणे : पूर्ववैमनस्य आणि परिसरातील वर्चस्वाच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. तसेच दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेले आरोपी अप्पर इंदिरानगर आणि बिबवेवाडी परिसरातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी आरोपींनी एका व्यक्तीच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप आहे. मात्र, संबंधित व्यक्ती सापडली नसल्याने आरोपींनी त्याच्या भावाला लक्ष्य केले. कोंढवा बुद्रुक येथील साळवे गार्डनजवळ त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी रतन विवस खत्री (वय २४), आकाश सायबान जमादार (वय १९), बंटी राजेश म्हस्के (वय २५), सोमा रमेश गायकवाड (वय २०), धीरज दामोदर कांबळे (वय २४) आणि संघ्या ऊर्फ संघर्ष गोरख सावंत (वय २०) या सहा जणांना अटक केली आहे. तसेच दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अप्पर इंदिरानगर परिसरात कारवाई केली. यावेळी काही आरोपींना पकडण्यात आले. तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड आणि लातूर जिल्ह्यांत शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत त्यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे करीत आहेत.






