पुणे : नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत २० आणि २१ नोव्हेंबर या दोन दिवसांत तब्बल ९६ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी, केटरर्स आणि ऑनलाइन डार्क स्टोअर्सची तपासणी करण्यात आली. या कारवाईत १२ आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली असून, आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसलेल्या पाच व्यवसायांना तातडीने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

छत्रपती शिवाजीनगर परिसरातील विशेष तक्रार निवारण मोहिमेदरम्यान पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. यामध्ये इन्स्टामार्ट – राजधी रिटेल प्रा. लि., ग्रीनलँड रेस्टॉरंट, शैलजा रेस्टॉरंट अँड बिअर बार, चैतन्य पराठाज (व्हेज) आणि सहाना व्हेज रेस्टॉरंट – शौनक हॉस्पिटॅलिटी यांचा समावेश आहे. याशिवाय रश्मी एंटरप्रायझेस, क्युबॅनोस – अरोमा हॉस्पिटॅलिटी आणि शिवाय कॉर्नर या तीन आस्थापनांची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.
पुणे विभाग-४ अंतर्गत पिंपळे सौदागर, वाकड आणि तळवडे परिसरातही तपासणी करण्यात आली. या कारवाईत मे. अनया फॅमिली रेस्टॉरंट (कुकरू कू थॉमसन), मे. लिटिल बिस्ट्रो बाय लिटिल दिल्ली, मे. फन फूड अ टेस्ट ऑफ इंदोर आणि मे. श्रीराम वडापाव या चार आस्थापनांची नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा कायद्यानुसार आवश्यक नोंदणी किंवा परवाना नसल्याने पाच आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये पिंपळे सौदागर येथील मे. न्यू पुना बेकरी आणि मे. विजय वडेवाला, तळवडे येथील मे. हॉटेल समर्थ व्हेज, वाकडमधील मे. बिस्मिल्लाह केटरर्स आणि मे. अप्पा इडली यांचा समावेश आहे.
अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी FDA कडून ही मोहीम राबवण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खाद्य आस्थापनांवर प्रशासनाचे लक्ष असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कारवाई केली जाणार आहे.






