पुणे : हॉटेलमध्ये मद्य पुरवण्यासाठी आवश्यक असलेला एफएल-३ परवाना नसतानाही ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या खराडी परिसरातील हॉटेल्सवर पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान हॉटेलमालक आणि वेटर यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, हॉटेलमध्ये मद्यपान करणाऱ्या ग्राहकांकडून मद्याच्या बाटल्या आणि मद्यविक्रीतून मिळालेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांना खराडी परिसरातील हॉटेल राजमुद्रा येथे एफएल-३ परवाना नसतानाही ग्राहकांना बसवून मद्यपान करण्याची सुविधा दिली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी हॉटेलमालक संजय तुळशीराम बोराटे (वय ५३, रा. पठारे वस्ती, चंदननगर) आणि वेटर संजय खंडू पातोडे (वय ३४, रा. राजाराम पाटीलनगर, खराडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेलमध्ये मद्यपान करत असलेल्या २० ग्राहकांकडून अर्धवट मद्य असलेल्या बाटल्या तसेच हॉटेलच्या काउंटरवरून मद्यविक्री करून मिळालेली रोख रक्कम जप्त करण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी हॉटेल निवांत येथेही तपासणी केली. या हॉटेलचे मालक गुलाबदादा खरात (वय ३२, रा. राजाराम पाटीलनगर, खराडी) हे परवाना नसतानाही ग्राहकांना हॉटेलमध्ये मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे आढळले. पोलिसांनी हॉटेलमधील नऊ ग्राहकांकडून मद्याच्या बाटल्या आणि मद्यविक्रीतून मिळालेली रोख रक्कम जप्त केली.

याशिवाय हॉटेल फर्माइशचे मालक अंकुश हेमराश वाघमारे (वय ३४, रा. बारोटेनगर, चंदननगर) आणि वेटर हेमराज भिस्त (वय ५५, रा. आपले घर सोसायटी) यांच्यावरही कारवाई करण्यात आली. तसेच तंदुर टक्का हॉटेलचे मालक ऋषी संदीप झांबरे (वय २४, रा. आपले घर, खराडी), प्रणय मोहन देवकर (वय २७, रा. फुरसुंगी) आणि वेटर रवींद्र कुमार सेने (वय २८, रा. फुरसुंगी) हेही आवश्यक परवाना नसताना ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे आढळले.
या हॉटेल्समधील २९ ग्राहकांकडून मद्याच्या बाटल्या आणि मद्यविक्रीतून मिळालेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील विनापरवाना मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्समध्ये खळबळ उडाली आहे.






